संजय घोडावत विद्यापीठ मध्ये राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन….!

कोल्हापूर : संजय घोडावत युनिव्हर्सिटी, (SGU)अतिग्रे येथे सोमवार दि. २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान MPL ४८ व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण ११ फेऱ्यात घेण्यात येणार आहेत. 

२६ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होणार आहे. साधारण पाच तासाची दररोज एक फेरी याप्रमाणे एकूण ११ दिवस म्हणजे ५ जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. दिल्लीचे MPL स्पोर्ट्स फाउंडेशन हे मुख्य स्पर्धा प्रायोजक असून संजय घोडावत युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहे. आमदार राजू आवळे, चितळे डेअरी (भिलवडी), जैन इरिगेशन (जळगाव), सिद्धार्थ मयूर, अनिरुद्ध देशपांडे, नरेंद्र फिरोदिया, सचिन शिरगावकर व पल्लवी कोरगांवकर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे :

अंतिम अकराव्या फेरीनंतर पहिल्या येणाऱ्या दहा क्रमांकाना एकूण रोख तीस लाख रुपयाची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धा विजेत्यास रोख सहा लाख रुपये चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.उपविजेत्यास रोख पाच लाख रुपये व चषक देऊन सन्मानले जाणार आहे. तृतीय क्रमांकास रोख चार लाख रुपये व चषक देऊन गौरविले जाईल. चौथ्या क्रमांकास रोख तीन लाख रुपयाचे बक्षीस आहे. पाचव्या व सहाव्या क्रमांकास प्रत्येकी रोख अडीच लाख रुपयाचे बक्षीस आहे. सातव्या व आठव्या क्रमांकास प्रत्येकी रोख दोन लाख रुपयाचे बक्षीस आहे तर नवव्या व दहाव्या क्रमांकास प्रत्येकी दीड लाख रुपयाचे रोख बक्षीस ठेवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *