कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करुन अनावश्यक फिरताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
काल रविवारी जनता कर्फ्यूत योगदान दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, आज दुचाकी तसेच चारचाकी मधून काही नागरिक शहरातून अनावश्यक फिरत आहेत. त्याच बरोबर गल्ल्या, उद्याने याठिकाणी गटा-गटाने विनाकारण बसून चर्चा करत आहेत. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून अद्यापही इतर दुकाने काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आजूनही बंद केली नाहीत. सर्व कोल्हापूरकरांनी अनावश्यक रस्त्यावर फिरु, नये गटा-गटाने चर्चा करत बसू नये, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर दुकाने त्वरित बंद करावीत अन्यथा सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहेत.
अनावश्यकरित्या वाहन चालवत असेल तर अशांवर उद्यापासून बंदी घालण्याचा विचार प्रशासन करीत आहे. याची दखल नगरिकांनी घ्यावी. ग्रामीण भागात परदेश प्रवास करुन तसेच पुणे, मुंबई येथून आलेली आहेत, अशा व्यक्तींनी घरामध्येच स्वत:चे अलगीकरण करावे. अशा व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात १४ दिवस ठेवले जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.