कोल्हापूर प्रतिनिधी ( दिनेश चोरगे ) : जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. राज्यामधील इतर शहरामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली आहे. आजपासून जिल्हयाच्या सिमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतू शहरामध्ये अजूनही नागरीक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर आजरेकर या स्वत: रस्त्यावर उतरुन भाजी मंडई व व्यापार पेठ याठिकाणी जाऊन नागरीकांना घरी बसण्याचे आवाहन केले. आज सकाळी त्यांनी शाहूपूरी व्यापार पेठ, लक्ष्मीपूरी भाजी मंडई, महाद्वाररोड, कपिलतीर्थ मार्केट, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, कुंभार गल्ली भाजी मंडई, बाजार गेट, पान लाईन, मटण मार्केट, महापालिका सिग्नल, शिवाजी चौक याठिकाणी फिरती करुन सर्व नागरीकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.
भाजी मंडईमध्ये नागरीकांनी गर्दी करु नये, प्रत्येक भाजी विक्रेत्येने अंतर ठेवावे, दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी तीन ते चार लोकांनांच दुकानात घ्यावे. इतरांना बाहेर ठराविक अंतरावर उभे करावे. जिल्हयामध्ये 144 कलम लागू झाले असल्याने 5 पेक्षा अधिक नागरीकांनी एकत्र जमू नये असे आवाहन महापौरांनी या सर्व ठिकाणी जाऊन केले.
तसेच जे बाहेर गावावरुन कोल्हापूरात आलेले आहेत व ज्यांच्यावर होम कोरोनटाईन असा शिक्का मारलेला आहे. त्यांनी घरामध्येच बसावे बाहेर फिरु नये आपण जर बाहेर फिरताना आढळल्यास आपल्याला स्वंतंत्र अलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाईल अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी अग्निशमन विभागाची गाडी त्यांच्याबरोबर होती. यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, दस्तीगीर मुल्ला, मनीष रणभिसे, आश्पाक आजरेकर, अग्निशमन व मार्केट विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.