विशेष वृत्त कौतुक नागवेकर
सांगली : अटल भूजल योजनेत सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी सक्रिय लोकसहभाग घेऊन आपली गावे पाणीदार करावी, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले.
केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजनेअंतर्गत जत तालुक्यातील डफळापूर येथे गावस्तरीय प्रशिक्षण उद्घाटन व जत तालुक्यातील योजनेत समाविष्ट 21 गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या अटल भूजल योजनेच्या गावस्तरीय प्रशिक्षण व सरपंच चर्चासत्राचे उद्घाटन खासदार संजय काका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी बोलत होते. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली चे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, डफळापूर गावचे सरपंच सुभाषराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी जत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी जत दिनकर खरात, तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडिदार, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे आदि उपस्थित होते.
खासदार संजय पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून ही पाणी मिळणार असल्याचे सांगून पाण्याबदल जागृता करुन पुढील पिढीसाठी पाण्याचा काटकसरपणे वापर करणे, जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी पर्याय म्हणून कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत जेणेकरुन पाण्याची बचत होईल, तसेच लहान शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचाव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांनी सर्व उपस्थित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावनी यासाठी भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याचे सांगितले. योजना पूर्णत: केंद्र शासन व जागतीक बँक पुरस्कृत असून प्रकल्प क्षेत्रातील ९५ गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळया विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार आहे. तसेच भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधित राखणे. मागणी आधारीत (पाणी बचतीचे उपाय योजना) व पुरवठा आधारीत (जलसंधारण व भुजल पुनर्भरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भुजल साठ्यात शाश्वता आणणे. भूजल पातळीची घसरण थांबविणे व पाणी गुपवत्तां सुधारणा करणे. सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादी च्या माध्यमातुन होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रभिमुखता साध्य करणे. जलसंपदा विभाग, कृषि विभाग, भूजल पुनर्भरण, रोजगार हमी योजना, विहिर पुनर्भरण, बंधारे शोषखड्डे यांची कामे प्राधान्याने राबविणे. भुजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे. सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्रात १०० टक्के ठिंबक व तूषार सिंचना खाली आणणे आदी विषयांची माहिती ऋषिराज गोसकी यांनी दिली.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी जि. प. सदस्य महादेवराव दुधाळ पाटील, अभिजीत चव्हाण, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील सर्व तज्ञ, जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेचे सर्व तज्ञ व समूह संघटक उपस्थित होते.