कोल्हापूर : कळंबा गावाला पाणीटंचाई भासू नये, यासाठी कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूरसाठी कळंबा तलावातील पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात करावा, तसेच जलजीवन मिशन योजनेतील पाण्याच्या टाकीसाठी कळंबा तलाव परिसरातील गट नंबर २९६ मधील जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.
कळंबा तलावातून कळंबा गाव, पाचगाव आणि कोल्हापूर शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या तलावाची पाणी पातळी अवघ्या १८ फुटांवर येऊन ठेपलीय. उन्हाळ्यापूर्वीच कळंबा तलाव आटत चालल्याने कळंबावासियांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे .याबाबत ठोस उपायोजना करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी कळंबा सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
येत्या महिन्याभरात बालिंगा पंपींग हाऊसच्या माध्यमातून आपटे नगर इथल्या टाकीचे पाणी कळंबा फिल्टर हाऊसला घेण्याचे प्रयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे कळंबा तलावातील पाण्याचा उपसा अत्यंत कमी प्रमाणात केला जाईल, असं महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं .
याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, जल अभियंता हर्षजित घाटगे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, माजी सरपंच विश्वास गुरव, उपसरपंच उदय जाधव, ग्रामपंचायत सदस्य विकास पोवार, रोहित मिरजे, ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप टिपूगडे, दत्तात्रय तिवले, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.