कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी त्यांचं काम पूर्ण झालं म्हणून कामगारांना वाऱ्यावर सोडू नये. हे माणुसकीला धरुन नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची तसेच वैद्यकीय सोय करावी, असे आवाहन करुन अशी बाब जर निदर्शनास आली तर त्या कारखानदारांविरुध्द फौजदारी कारवाई केली जाईल. असा इशारा आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला.
परराज्यातून आलेले तसेच इतर जिल्ह्यातून आलेले कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांच्या त्यांच्या राज्यात परत जाण्याची त्यांची इच्छा होती. परंतु राज्य बंदी, जिल्हा बंदीच्या परिस्थितीत अशा कामगारांना त्यांच्या राज्यात व जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देता येत नाही, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यामध्ये सध्या तीन साखर कारखाने सुरु आहेत. दोन दिवसात ते बंद होतील. त्या त्या साखर कारखान्यांनी ऊस तोड कामगार व कर्मचाऱ्यांची त्या त्या ठिकाणी सोय करावी. एमआयडीसी किंवा इचलकरंजी परिसरात कापड उद्योगांमधील कामगार हे पर राज्यातील जरी असले तरी ते त्या ठिकाणी निवासी कामगार आहेत. अशा कामगारांची जीवनावश्यक वस्तुंची सुविधा करण्याचे निर्देश कारखान्यांच्या मालकांना दिले आहेत.
अशा कालावधीत त्या त्या कारखानदारांनी, आस्थापनानी त्यांची जबाबदारी घेवून त्यांची राहण्याची, अन्नधान्याची व वैद्यकीय सुविधा या सर्वांची सोय करणं आवश्यक आहे याला प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकारी देसाई म्हणाले.
कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी

Read Time:2 Minute, 25 Second