झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट

कोल्हापूर – दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मूलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे.

विविध विषयांवरील प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी युवा या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या जय भीम… एका महानायकाची गाथा या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य या मालिकेतून उलगडणार आहे. १४ एप्रिल या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या मालिकेला सुरवात झाली. महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख पाहता येणार आहे.

Advertisements

तरुणाईच्या मनातील विषयांना मालिकांमधून मांडण्यासाठी सुरू झालेल्या झी युवा या वाहिनीने आता समाजातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रम व मालिकांमधील वैविध्य, प्रबोधन आणि मनोरंजनाची योग्य सांगड आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती यामध्ये झी युवा वाहिनी नेहमीच अग्रेसर आहे. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा यासाठी झी युवा वाहिनीचा पुढाकार कौतुकास्पद आहे. याच पंक्तीत आता झी युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.

जय भीम … एका महानायकाची गाथा ही १४ एप्रिलला सुरू झालेली मालिका झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी युवानेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उद्धारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारित आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.

झी युवा वाहिनीवर या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या मालिकेची प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता मालिकेत डॉ. आंबेडकर यांची व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार हे पाहण्याची आतुरताही आता शिगेला पोहोचली आहे. यंदा डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली. हा योगायोग साधून झी युवा वाहिनीने महामानवाची गाथा मालिकेतून मांडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करण्याचा संकल्प केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *