Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : शिरोली परिसरातील आसपासच्या गावातील नदी काठावरील व विहिरीतील पाण्याच्या मोटरपंप सेटची चोरी करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.याप्रकरणी ,राहुल अर्जुन पाटील (वय ३१), ऋषिकेश लक्ष्मण पाटील ( वय २४), विनायक मारुती पाटील (वय ३४),दीपक भिवाजी निकम (वय २३ ) गणेश पांडुरंग पाटील (वय २५), सम्राट सरदार पाटील ( वय २४ ) सर्वजण रा. म्हाळसवडे ता.करवीर , अशी त्यांची नावे असून त्यांच्या जवळून चोरी केलेले चार पाण्याचे मोटार पंप सेट, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी आणि दोन मोटरसायकली असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
करवीर तालुक्यातील म्हाळसवडे, सडोली दुमाला व घुंगुरवाडी या परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी विहिरीमधील बोरवेलचे मोटार पंपसेट चोरीला गेले होते. याबाबत करवीर पोलिसांचा तपास सुरू असताना रविवारी (१४ रोजी) म्हाळसवडे गावातील सहा जण चेरी कलरच्या बोलेरो कार मधून चोरी केलेले पंपसेट विक्री करण्यासाठी म्हाळसवडे ते भाटणवाडी रोडवर जाणार असल्याची बातमी गुन्हे शोध पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री सापळा रचण्यात आला. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वर्णनातील गाडी येताना दिसली.पोलिसांनी गाडीजवळ जाऊन चौकशी केली असता गाडीमध्ये सहा जण मिळून आले, तपासणी केली असता गाडीच्या सीट खाली पोत्यांमध्ये बोरवेलच्या मोटारी, केबल, आढळून आल्या. संशयीताजवळ चौकशी केली असता हळसवडे गावातील लेंडोरे नावाच्या शेतामधून चोरी केल्याची कबुली दिली. यातील आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून आणखी चोरीचे गुन्हे उकलण्याची शक्यता आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर संकेत गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सुरज बनसोडे, पो हे कॉ. विजय तळसकर, सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, प्रशांत पाटील, श्रीधर जाधव, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, विजय पाटील, धनाजी बर्गे, मुरलीधर लांघी, यांनी केली.