भागीरथी महिला संस्था आणि महाडिक परिवाराच्या वतीनं वयोवृद्धांसाठी १ हजार ऍडल्ट डायपर

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :  लॉकडाऊनचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका अनेकांना अनेक प्रकारे बसलाय. कोल्हापूर जिल्हयातील अनेक सेवाभावी संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत असते. पण त्यातही आता कपात झालीय, अशा वेळी वयोवृध्दांसाठी काम करणार्‍या संस्थांना एक वेगळीच गरज होती. अंथरूणावर खिळलेल्या किंवा शारिरीक नियंत्रण सुटलेल्या वृध्दांसाठी डायपरची गरज असते. जाहीरपणे सांगताही येत नाही, पण तरीही अत्यंत आवश्यक अशा या अडचणी वेळी महाडिक परिवारानं मदतीचा हात पुढं केला.
त्यातून सुमारे १ हजार ऍडल्ट डायपर विविध संस्थांना देण्यात आले. त्यातून एक प्रकारे अनोखी रूग्ण सेवाच झालीय.
लॉकडाऊनमुळं संपूर्ण आर्थिक चक्र विस्कळीत झालंय. अनेक सेवाभावी संस्थांना येणारा देणगीचा ओघ कमी झालाय. त्यातून वेगळे प्रश्‍न निर्माण झालेत. कोल्हापुरात वयोवृध्दांच्या सेवेसाठी आणि औषधोपचारासाठी काम करणार्‍या काही संस्था आहेत. सावली केअर सेंटर, माऊली केअर सेंटर, मातोश्री वृध्दाश्रम यासह अनेक ठिकाणी या ज्येष्ठ व्यक्तींच्या आयुष्याची संध्याकाळ सुरू आहे. अशा वेळी काही संस्थांना एक वेगळीच अडचण निर्माण झाली. पण त्यासाठी महाडिक परिवार आणि भागीरथी महिला संस्थेनं मदतीची तयारी दाखवली. त्यानुसार पिरवाडी इथल्या सावली केअर सेंटर, संभाजीनगर मधील माऊली केअर सेंटर आणि नाळे कॉलनी मधील सावली सेंटर अशा तीन ठिकाणी सुमारे १ हजार डायपरचं वाटप करण्यात आलं. माजी खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक आणि इंद्रजीत जाधव यांनी या संस्थामध्ये जावून, तिथल्या कामाची माहिती घेतली आणि डायपर दिले.
जे वृध्द नागरीक अंथरूणाला खिळून आहेत, ज्यांचं शारिरीक नियंत्रण सुटलं आहे, त्यांच्यासाठी डायपरचा वापर अत्यंत गरजेचा असतो. वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठीही डायपरची आवश्यकता असते. उघडपणे बोलताही येत नाही, अशी ही निकडीची वस्तु आहे. हीच बाब लक्षात घेवून, भागीरथी संस्था आणि महाडिक परिवाराच्या वतीनं या तीन संस्थांमध्ये १ हजार डायपर देण्यात आले.
दिपक कदम, राहूल कदम, संभाजी कदम, मंगल कदम, गौरी देशपांडे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *