डीपीडिसीच्या माध्यमातून जिल्ह्यात कोव्हिड -१९ तपासणी दुसरी लॅब सुरू :पालकमंत्री पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप :  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज दुसरी लॅब कार्यान्वित करण्यात आली.
जिल्ह्यात सुरु झालेल्या दोन्ही प्रयोगशाळेचा कमीत कमी वापर होवून जिल्हा कोव्हिड-१९ मुक्त रहावा, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही लॅबची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागात कोव्हिड- १९ तपासणी ही दुसरी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.

रुग्णांची चाचणी लवकर व्हावी या उद्देशाने केंद्र शासन आणि राज्य शासनाने आरटी पीसीआर प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये आज ही प्रयोगशाळा कार्यान्वित झाली, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, २३ एप्रिल रोजी सीबीनेट तंत्रज्ञानाची लॅब कार्यान्वित केली आहे. यापूर्वी स्वॅब तपासणी करण्यासाठी पुण्याला पाठवावे लागत होते. त्यानंतर मिरज येथे पाठवावे लागत होते. आपल्या जिल्ह्यामध्येच या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अहवाल लवकर मिळेल आणि क्वान्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती मिळवणं प्रशासनाला सोपे होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रयोगशाळांना निधी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *