मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त….

कौतुक नागवेकर/मिरज : मिरजेतील जनावरांच्या बाजाराजवळ पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख (वय ३०, रा. ईदगाहनगर, मिरज) याला स्थानिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे असलेले देशी बनावटीचे ५० हजाराचे पिस्तुल व दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलिसांकडून अधिक मिळालेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक बाजारात राऊंड मारत असताना पोलिसांना मिरजेतील जनावर बाजारात एकजण पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची ठोस माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साफळा रचला. थोड्याच वेळात आरोपी जनावरांच्या बाजाराच्या जवळ येवून थांबला. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्वतःचे जावेद शेख असे नाव सांगितले. त्याची कसून चौकशी केली असता कमरेला अडकवलेले देशी बनावटीचे पिस्तुल मॅग्झीनसह आढळले. त्यासोबत २ जिवंत काडतुसे देखिल आढळून आली. त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना देखील नव्हता,त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिस कर्मचारी अभिजीत ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन जावेद शेख याला गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई सहायक फौजदार अनिल ऐनापुरे तसेच अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, अनंत कुडाळकर, इम्रान मुल्ला, संकेत मगदुम, विनायक सुतार, सुनिल जाधव, सूरज थोरात, श्रीधर बागडी, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील अधिक तपास गांधी चौक पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *