गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 26 कामांना मान्यता..

सांगली : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये जिल्ह्यातील 26 कामांना मान्यता देण्यात आली. सन २०२४-२०२५ मध्ये मान्यता दिल्या या कामांसाठी जलसंधारण विभागाने शासनस्तरावर निधीची मागणी करावी. गाळ काढण्याचे कामांवर संबधित यंत्रणेने देखरेख करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी धनंजय साहुत्रे, कृषी उपसंचालक डी. एम. पाटील आदी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या कामांमध्ये सांगली पाटबंधारे विभागाकडील १२ कामे, जिल्हा परिषद सांगली कडील ८ कामे आणि मृद व जलसंधारण विभागाकडील ६ कामांचा समावेश आहे. यामध्ये जत तालुक्यातील १७ कामे, कवठेमहांकाळ तालुक्यातील १, आटपाडी तालुक्यातील ३, खानापूर तालुक्यातील ३ आणि वाळवा तालुक्यातील २ कामांचा समावेश आहे. ही कामे मेघराज एज्युकेशन सोसायटी आंबेगाव बु. पुणे, संकल्प प्रतिष्ठान बालाजीनगर पुणे, ऋतुजा शिक्षण, शेती, संशोधन आणि विकास संस्था, ढालगाव ता. कवठेमंकाळ आणि वृक्ष फाउंडेशन, आटपाडी या अशासकीय संस्थांमार्फत करण्यात येणार आहेत.

जत तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव सिद्धनाथ, सनमडी, सोरडी, खोजनवाडी, बिळुर (२ कामे), दरिबडची, पांडोझरी, भिवर्गी, जालिहाळ, गुगवाड, शेगाव, साठवण तलाव कोळिगिरी, गुगवाड, कोसारी व कंठी, पाझर तलाव काराजनगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव बोरगाव, आटपाडी तालुक्यातील पाझर तलाव तडवळे, हिवतड व हिवतड (पाढरिची ओघळ), खानापूर तालुक्यातील पाझर तलाव धोंडेवाडी, रामनगर व घाडगेवाडी आणि वाळवा तालुक्यातील गाव तलाव ओझर्डे व इटकरे या कामांचा समावेश आहे.
बैठकीत सन २०२३-२०२४ मध्ये या योजनेमधून प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांचा आढावाही घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *