कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या संकटाच्या काळात युद्धपातळीवर यथाशक्ती सेवाकार्य करीत आहेत. याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात बेकायदेशीर घटनांची मालिकाच सुरू आहे.
राज्यात सत्तेच्या जोरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे प्रकार घडत आहेत. सत्तेचा गैरवापर करून विरोधी आवाज दाबण्याचे संघटित प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर त्यांच्या सांस्कृतिक पेहरावाचा भाग असणाऱ्या टोपी वरून केली गेलेली असंवैधानिक शेरेबाजी व समाज माध्यमातून अभद्र टीका टिप्पणी केली जात आहे.
राज्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची केली जाणारी गळचेपी, पत्रकारांवर दाखल केले जाणारे गुन्हे, पत्रकारितेचा दाबला जाणारा आवाज, संवैधानिक मूल्यांची पायमल्ली त्याचबरोबर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमातून दिल्या जाणाऱ्या एन्काऊंटरच्या धमक्या असे अनेक प्रकार राजरोस घडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडियावर संतप्त लिखाण करणाऱ्या कार्यकर्त्यांची बेकायदेशीर धरपकड करण्यात येत आहे. सरकार विरोधी लिखाण केल्यामुळे पूर्वग्रहदूषित सूड भावनेतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सध्याच्या कोविड -१९ च्या आपत्तीच्या काळात अशा प्रकारच्या वातावरणामुळे समाजात घबराट पसरत आहे. वरील सर्व घटना निषेधार्ह आहेत.
या सर्व घटनांचा आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन पद्मावती कदम पोलीस उप अधीक्षक (गृह) यांना सादर करण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून राज्य सरकारला निषेध अवगत करावा तसेच या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, दिलीप मेत्राणी, चंद्रकांत घाटगे, मामा कोळवणकर, प्रग्नेश हमलाई यांची उपस्थिती होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचा भाजपाच्यावतीने तीव्र निषेध
