कोल्हापूर, दि. 19 : कृषी विभागामार्फत सन 2023 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून विविध कृषी पुरस्कार 2023 साठी जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी आपले प्रस्ताव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, महिला यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुरस्काराचे नाव, विभागस्तर पुरस्कार संख्या, पुरस्काराची रक्कम व शेरा याप्रमाणे- डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, संख्या – 1, रक्कम 3 लाख रुपये व राज्यातून फक्त 1,
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, संख्या – 1, रक्कम 2 लाख रुपये व विभागातून 1.
जिजामाता कृषीभूषण पुरस्कार संख्या-1, रक्कम 2 लाख रुपये व विभागातून -1
कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार संख्या-1, रक्कम 2 लाख रुपये, विभागातून-1,
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार संख्या-1, रक्कम 1 लाख 20 हजार, विभागातून-1,
युवा शेतकरी पुरस्कार संख्या-1, रक्कम 1 लाख 20 हजार, विभागातून-1,
उद्यानपंडित पुरस्कार संख्या-1, रक्कम 1 लाख रुपये, विभागातून -1,
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट) संख्या-3, रक्कम 44 हजार रुपये, प्रति जिल्ह्यातून 1 या प्रमाणे आहे.