विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने रविवार ( दि.१०) पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय होलसेल, रिटेल व्यापारी असोसिएशन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना वगळण्यात आले आहे. देशभर लॉक डाऊन सुरू असतानाच गांधीनगर बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांना दुकाने सुरु की बंद ठेवायची याबाबत संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर व्यापारीपेठेत गेल्या ४१ दिवसापासून लॉक डाऊन कायम आहे. येथे अनेक राज्यातून लोक खरेदीसाठी येतात. त्यामुळे ही व्यापारीपेठ सुरु करणे म्हणजे महामारीला निमंत्रण देण्यासारखे होईल, याचे गांभीर्य ओळखून येथील व्यापाऱ्यांनी आणखीन काही दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही व्यवसायांना शर्ती व अटीनुसार व्यवसाय सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी गांधीनगर व्यापारीपेठेतील होलसेल व रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. नियमांचे उल्लंघन होणार नाही ,अशी खबरदारी घेऊन व्यवसाय सुरू करण्याबाबत पोलिसांनी सूचना केल्या.
राज्यात कोरोना संशयितांची संख्या वाढत असून व्यापारीपेठेत याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी येथील व्यापाऱ्यांनी याबाबतची खबरदारी घ्यावी, असे सूचित केले.
त्यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी आम्हीही प्रशासना बरोबर आहोत, अशी ग्वाही देत १० मेपर्यंत येथील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय घेतला. १० मे नंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले.
यावेळी शंकर दुल्हानी, सुरेश अहुजा, अशोक टेहलानी, सुरेश टेहलानी, दिलीप कुकरेजा, गोवालदास कट्यार, बक्षाराम दर्डा, मदन मलानी, राजू नरसिंगाणी, संतोष आहुजा यांच्यासह होलसेल व रिटेल कापड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, भारतीय सिंधू सभेचे सर्व सदस्य, व्यापारी उपस्थित होते.
गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने १० मे पर्यंत बंद राहणार

Read Time:3 Minute, 45 Second