मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : शुक्रवार पेठ येथील शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत झाली. अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षी आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त मठात एक आठवडाभर कीर्तन, प्रवचन, होमहवन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरण, महाप्रसाद होऊन दुपारी मठातून पालखी करवीर निवासिनी अंबाबाईच्या देवळात जाते. तेथून स्वामीजी देवीचे दर्शन घेऊन मठात पालखी परत येताना आतिषबाजी होऊन उत्सवाची सांगता होते. यावेळी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती असते.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उत्सव रद्द करण्याचा निर्णय आद्य शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी घेतला होता.
त्यानुसार गेला आठवडाभर उत्सव साधेपणाने होऊन गुरुवारी सामाजिक अंतराचे भान ठेवून, मठाच्या परिसरात पालखी प्रदक्षिणा होऊन त्याची सांगता झाली. आठवडाभर पीठस्थ देवतांच्या पुजाऱ्यांकडून देवतांना नित्य अभिषेक केला गेला. यावेळी शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, सचिव शिवस्वरूप भेंडे यांच्यासह मठातील भक्त उपस्थित होते.