कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या दोन लॉकडाऊन नंतर तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये शासनाने ऑरेंज विभागातील व्यावसायिकांसाठी काही सूट दिलेली आहे. ऑरेंजझोन मध्ये असलेल्या कोल्हापूर शहरातील, अत्यावश्यक सेवा नसलेल्या व्यावसायिकांना सम-विषम तारखेस व्यवसाय करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.
हे करत असताना रहिवासी संकुलातील दुकाने मात्र बंद ठेवण्यासाठी प्रशासन सक्ती करीत आहे, हे सर्वथा अन्याय कारक आहे. रहिवासी संकुलातील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणारे व्यवसायिक हे छोटे व्यवसायिक असून ,अन्य सर्व व्यावसायिकांप्रमाणे त्यांचेही उपजीविकेचे साधन असलेली ही दुकाने लॉकडाऊनमुळे बंद आहेत.
शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यापारी संकुलातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवावीत तसेच पाच पेक्षा अधिक दुकाने एका ठिकाणी असल्यास ती ही बंद ठेवावीत असे म्हटले आहे.
कोल्हापूरात आपण रोड वरील सर्व दुकाने सम-विषम तारखेस उघडण्याची परवानगी दिली आहे तर रहिवासी संकुलातील दुकाने बंद ठेवण्याची कारवाई प्रशासन करीत आहे, यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे रहिवासी संकुलातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली.