कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शहरामध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. महानगरपालिकेने प्रभागनिहाय एक समिती स्थापन केली आहे. या प्रभाग समिती सचिवांशी बुधवार १३ मे रोजी आयुक्तांनी निवडणूक कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आढावा घेतला.
महापालिकेने कोरानाच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष स्थानिक नगरसेवक असून समन्वय अधिकारी त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, सचिव आरोग्य निरिक्षक किंवा वरिष्ठ लिपीक, सदस्य म्हणून घरफाळा, पाणी पुरवठा विभागाचा लिपीक, एक मुकादम व एक कामगार अशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
या समितीवर नियंत्रण अधिकारी म्हणून उप-शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने त्या त्या प्रभागात औषध फवारणी, स्वच्छता, कॉरंटाईन शिक्का मारलेले नागरीक घरीच आहेत का बाहेर फिरतात याची खात्री करणे, भागामध्ये परदेशी, मुंबई, पुणे अथवा इतर ठिकाणाहून आलेल्या नागरीकांच्या नोंदी ठेवणे, भाजीपाला, किराणा भागामध्ये सुरळीत सुरु आहे का ते पाहणे, आपत्कालीन परिस्थतीत तातडीने बॅरेकेटींग लावून भाग सील करणे व इतर अनुषंगिक व्यवस्था या समितीने करणेचे आहे.
यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रत्येक प्रभागामध्ये समितीकडून सुरु असलेल्या कामाकाजाचा आढावा घेतला. सध्या बाहेर गावाहून कोल्हापूर शहरात नागरीक मोठया संख्येने येत आहेत. त्यामुळे आता प्रभाग समितीची महत्वाची जबाबदारी आहे. अजूनही बरेचशे लोक शहरामध्ये अथवा जिल्हयामध्ये येत आहेत. त्यामुळे प्रभाग सचिवांनी आता प्रभागामध्ये सर्वांची मदत घ्यावी. महापालिका शिक्षक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक हे आपल्याला कोरोना योध्दा म्हणून मदत करण्यात तयार आहेत. त्यामुळे या सर्वांची मदत घेऊन प्रभागामध्ये नविन येणाऱ्या प्रत्येक नागरीकावर लक्ष ठेवा. प्रत्येकाला भाग वाटून द्या त्यामुळे सर्वांवर लक्ष ठेवले जाईल. होम क्वारंनटाईन केलेल्या नागरीकाच्या घरी जा त्याची तपासणी झाली का तो घराबाहेर पडतो का याबाबत लक्ष देण्यासाठी तेथील जवळपासच्या शिक्षकांच्यावर ही जबाबदारी सोपवा. आता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे कारण आता धोका मोठा आहे. एखाद्या ठिकाणावरुन बाहेरील नागरीक आल्याचे समजताच तातडीने जागेवर जाऊन भेट द्या. आपल्या परिसरातील पोलिस स्टेशनच्या संपर्कात रहा. त्यांची काही मदत लागल्यास ती मदत घ्या. उपनगरामध्ये रात्रीच्यावेळी नागरीक रस्त्यावर गप्पा मारत बसतात. त्यांच्यावर शिक्षक, तरुण मंडळ इतर संस्थेच्या सहकार्याने लक्ष ठेवा. प्रत्येकाने मास्क लावले पाहिजे. त्याने नियमांचे उल्लघंन केल्यास तातडीने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा. सर्व सचिवांना वारंवार भागात जावे लागत असलेने त्यांना फेस शिल्ड उपलब्ध करुन दिले आहे. ते आपल्या विभागीय कार्यालयातून घेऊन जावे. महापालिकेकडे ११० थर्मल स्कॅनर आहेत. ते सर्व थर्मल स्कॅनर सर्व्हे टिमकडे दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये एक थर्मल स्कॅनर व उपनगरासाठी दोन थर्मल स्कॅनर तपासणीसाठी देण्यात येत आहेत. संस्थात्मक अलगीकरणची संख्या वाढवली आहे. यासाठी समन्वय अधिकारी नेमलेले आहेत. त्याठिकाणची सर्व जबाबदारी त्या समन्वय अधिकाऱ्यांची राहील. यासाठी त्यांनी त्याठिकाणी भेट देऊन काही अडीअडची आहेत का? याची पडताळणी करायची आहे. आपल्या प्रभागामध्ये अजून काही संस्थात्मक अलगीकरणासाठी उपलब्ध होतात का?, याचीही पडताळणी करा. बाहेर गावाहून येणारे ड्रायव्हर व किन्नर यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांना बाहेर फिरु देऊ नका अशा सुचना दिल्या. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहाययक आयुक्त अवधूत कुंभार, उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता व सर्व सचिव उपस्थित होते.