Getting your Trinity Audio player ready...
|
Media Control news network
वाशिम येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय नितीन पगार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिनांक १५ जून रोजी वाशिम येथे पगार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे पालन करत आरोटे यांनी नितीन पगार यांच्या पत्नी जानवी नितीन पगार आणि पुत्र युगंधर यांना ११ हजार रुपये रोख मदत आणि जीवनावश्यक किराणा साहित्याचे किट सुपूर्त केले. त्यांनी कुटुंबीयांना भावनिक आधार देत सांगितले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, हा संघर्ष तुम्ही एकटा करायचा नाही.”
या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांनी पगार कुटुंबीयांची पार्श्वभूमी व परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक संपर्कप्रमुख विजय शेळके, संजय फुलसुंदर, अॅड. सुरेश टेकाळे, संजीव भांदुर्गे, श्याम अपूर्वा, सामाजिक कार्यकर्ते गजानन धामणे तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर डॉ. विश्वासराव आरोटे यांनी तातडीने वाशिम गाठून कुटुंबीयांचे सांत्वन केले. पत्रकार स्व. नितीन पगार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या भेटीने पगार कुटुंबीयांच्या डोळ्यांत मायेच्या ओलाव्याने आनंदाश्रू तरळले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या संवेदनशीलतेमुळे पत्रकार बांधवांमध्ये भावनिक आधार आणि संघटनात्मक भक्कमपणा अधोरेखित झाला आहे.