सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लॉकडाऊनमुळे शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यात अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यातील येण्या-जाण्याचा पास द्यावा अशी मागणी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केली आहे.
सध्या राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या शेजारच्या जिल्ह्यातही जाण्यात अडचणी येत आहेत सांगली जिल्ह्यातील उद्योजकांचे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत शिरोळ तालुक्यात उद्योगधंदे आहेत.
अकिवाट औद्योगिक वसाहत, छत्रपती शाहू औद्योगिक वसाहत आणि पार्वती औद्योगिक वसाहत या तीन वसाहतींमध्ये सांगलीतील उद्योजकांचे उद्योगधंदे आहेत परंतु या ठिकाणी असलेले परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतू लागल्याने उद्योजकांना स्थानिक कामगारांना हाताशी धरूनच उद्योग चालू ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा सीमा बंद केल्यामुळे सांगलीतील उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत जाण्यात अडचण येत असल्यामुळे उद्योग सुरू करता येत नाहीत.
दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनाने तसेच जिल्हाधिकार्यांनी यात लक्ष घालून सांगलीतील उद्योजक व कामगारांना रोज येण्या-जाण्यासाठी पास द्यावेत अशी मागणी आज आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार घाडगे म्हणाले , सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे रेंजमध्ये आहेत तसेच सरकारने ऑरेंज झोनमधील उद्योग-व्यवसाय सुरू करावेत अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे कामगारांचे रुतलेले आर्थिक गाडे सुरळीत करण्यासाठी उद्योग सुरू होणे आवश्यक आहेत. मात्र सांगलीतून कोल्हापूरला जाताना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर उद्योजक व कामगारांची अडवणूक केली जात आहे. त्यांना रोज येण्या- जाण्यासाठी पास उपलब्ध करून दिल्यास येथील कामगार दैनंदिन कामावर जाऊ शकतील. त्यामुळे उद्योगधंदे सुरळीत चालू होतील , हे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
