वीज कामगारांच्या आरोग्याची ‘त्या’ दोघींनी घेतली काळजी
३६०० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना होमिओपॅथी औषधींचे नि:शुल्क वितरण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोव्हिड- १९ या महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी यांचेप्रमाणे वीज कर्मचारी देखील जोखीम पत्करुन वीज सेवा देत आहेत. या महामारीपासून वीज कर्मचाऱ्यांना कोसोदूर ठेवण्यासाठी, दोन अभियंता पत्नींनी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ३६०० वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना होमिओपॅथी औषधींचे (गोळ्या) नि:शुल्क वितरण केले असून, या दोघींच्या सामाजिक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बारा महिने २४ तास वीजपुरवठ्यासाठी कार्यरत असलेल्या आपल्या पती व त्यांच्या सहकाऱ्यांची धडपड त्यांनी जवळून बघितली आहे. वीज ग्राहकांशी सातत्याने येणाऱ्या संपर्कातून कोरोना संपर्काची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे डॉ. अर्चना विक्रांत सपाटे व डॉ. प्राजक्ता परिक्षित उदगावे या दोघींनी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या ‘अर्सेनिक अल्बम-३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषंधाचा पुरवठा कोल्हापुरातील सर्व वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना करण्याचा निर्णय घेतला. डॉ. सपाटे यांचे पती श्री. विक्रांत सपाटे कदमवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आहेत. तर डॉ. उदगावे यांचे पती श्री. परिक्षीत उदगावे कोल्हापूर ग्रामीण-१ विभागात सहा. अभियंतापदी कार्यरत आहेत.
या दोघांची मदत घेऊन या दोन महिला डॉक्टर्सनी महावितरणच्या सर्व विभागापर्यंत हे औषध पोहोचवले आहेत.
आयुष मंत्रालयाने शिफारस केल्याप्रमाणे या होमिओपॅथी औषधांची मात्रा घेतल्यास कोरोनापासून बचाव होत असल्याचे या दोघींनी सांगितले. कुटुंबातील सहा सदस्यांकरिता ही मात्रा (डोस) असून, त्याचे सेवन कसे करायचे, याची माहिती त्यांनी औषधासोबत दिली आहे. महावितरण कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे यांनी या दोन्ही महिला डॉक्टर्सच्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *