कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : करवीर पूर्व भागात वळीव पावसाने गेली दोन दिवस हजेरी लावल्याने मातीला सुगंध सुटला आहे, तर शेतातील मशागतीच्या कामाची धांदल सुरू झाली आहे.
अनेक ठिकाणी शेतकरी भात, भुईमूग, सोयाबीन ची पिके घेण्यासाठी सज्ज झाला आहे. तर करवीर पूर्व भागातील
गडमूडशिंगी परिसरात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतात पेरणी सुरू झाली आहे.
बाजारात येणाऱ्या नवीन वाणांचा शेतकरी वापर करू लागल्यामुळे पारंपरिक वाणे नष्ट होऊ लागली आहेत. अनेक जुन्या वाणांच्या जाती नष्ट होत आहेत. सध्या भात, सोयाबीन, भुईमूग पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे
या काळात शेतकऱ्यांनी केवळ बाजारातील बियाण्यांवर भर न देता जुन्या बियाणांचा वापर करावा तसेच सेंद्रीय खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात भात आणि सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. खरीप हंगामातील पेरणी व टोकणी कामाची धांदल सुरू आहे. कृषी विभागाकडे कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध होते. तर कधी बाजारातून बियाणे मिळाले नाही तर शेतकरी घरचे बियाणे वापरतो. हे बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. बऱ्याचदा उगवण क्षमता कमी झालेले बियाणे वापरले गेल्यास अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी या घरगुती बियाण्यांवर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्याची उगवणशक्ती पाहणे देखील गरजेचे आहे.
हवामान खात्याने येत्या तीन जून पर्यत पाऊस सुरू होईल, असे सांगितले होते, त्या अगोदरच दोन दिवस अगोदर पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये शेंगदाणे घालण्याचे काम चालू झाले आहे. कालचा एक पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांचे शेतामध्ये धांदल उडत आहे . गडमूडशिंगी येथील शेतकरी बाळू बिरू पुजारी व भगवान पुजारी यांच्या शेतामध्ये भुईमूग टोकणीत मग्न आहेत.