कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या बदली प्रकरणावरून, कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने, कोल्हापुरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पण तरीही अशा संकट काळातही वैद्यकीय अधिष्ठाता सारखे महत्वाचे पद रिकामे ठेवले जात आहे. शिवाय या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्ती यावी, यासाठी कोल्हापुरातील एका राज्यमंत्र्यांचा दबाव आणि प्रयत्न निषेधार्ह आहे.
एरवी कोरोना सारख्या आपत्ती काळात, राजकारण आणू नये, असे सांगणार्या सत्ताधारी मंडळींना, आपल्याकडून सुरू असलेल्या हिन पातळीवरील राजकारणाची जाणीव होत नाही का ? असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी पत्रकातून केला आहे.
राज्यमंत्र्यांनी डॉ. गजभिये यांची खूनशी स्वभावातून बदली घडवली. दुसर्या ज्येष्ठ मंत्र्यांनी ही बदली थांबवली. तर त्यानंतर जिल्हयातील ३ मंत्री एकत्र येवून, अधिष्ठाता म्हणून कुणाची नेमणूक करायची, याचा निर्णय घेतील, अशी बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झाली.
ही भारतीय लोकशाहीची एकप्रकारे थट्टा नाही का? आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी एका राज्यमंत्र्यांचा एवढा अट्टाहास कशासाठी? याचे उत्तर जनतेला कळणे आवश्यक आहे. मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून, कोरोना सारख्या आपत्ती काळात कोल्हापूरच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार आहे.
अधिष्ठातांची जळगावला बदली करणे, त्यानंतर अर्ध्यावाटेवरून त्यांना माघारी कोल्हापुरात यावे लागणे, कोल्हापुरात आल्यानंतर पदभार न मिळाल्याने तिष्ठत राहणे आणि पुन्हा अधिष्ठातांची बदली करण्यासाठी राजकीय नेत्यांनी बैठक बोलावणे, असे प्रकार अनाकलनीय आहेत.
राजकीय नेत्यांच्या या अट्टाहासामुळे, कोल्हापुरातील वैद्यकीय अधिष्ठाता पदावर प्रभारी अधिकारी काम करत आहेत. इतक्या महत्वाच्या पदावर काम करणार्या व्यक्तीची गुणवत्ता, अनुभव न पाहता, केवळ आपल्या मर्जीतील व्यक्ती असावी, हा दुराग्रह कशासाठी ? त्यामुळे कोल्हापुरातील अधिष्ठाता पदाचे अवमुल्यन होत असून, अधिकार्यांची नियुक्ती केवळ राजकीय नेत्यांच्या इगो मध्ये अडकली आहे. त्यामुळे कोल्हापूरची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. असेही श्री. महाडिक यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.