कोल्हापूरच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चॅनेल बी च्या वतीने कलायात्री या नावानं नवी मालिका सादर होणार.

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप :  लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका कलाविश्वालाही बसला आहे. गायन- वादन- अभिनय- नृत्य अशा कला प्रांतातील कलाकारांचे कार्यक्रम सादर होऊ शकत नाहीत. त्यामुळे चॅनेल बी मार्फत, या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, कलायात्री या नावाने नवी मालिका सादर होणार आहे.

कोल्हापूरातील कलाकारांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी, लवकरच कलायात्री ही मालिका प्रसारित होणार आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, उपाध्यक्ष धनंजय महाडिक, उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत, आज कलायात्री मालिकेच्या छायाचित्रणाचा शुभारंभ करण्यात आला. सदाबहार गाणी, एकांकिका, स्किट, समुह नृत्य आणि स्टँडअप कॉमेडी असे कलाविष्कार कोल्हापूरचे कलाकार सादर करणार आहेत.

Advertisements

लॉकडाऊनमुळं सांस्कृतीक क्षेत्रालाही मोठा फटका बसलाय. गाण्याचे कार्यक्रम, ऑर्केस्टा, नाटक असे कलाविष्कार ठप्प झाले आहेत. कोल्हापूर हे कलेचे माहेर घर आहे. त्यामुळे गायन-वादन-नृत्य-नाटय या क्षेत्रातील अनेक कलाकारांना लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला आहे. गेले तीन महिने एकही जाहीर कार्यक्रम झाला नसल्याने, कलाकारांची परवड होत आहे. अशावेळी चॅनेल बी ने पुढाकार घेवून, कलायात्री ही मालिका सुरू करण्याचे ठरवले आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज कलायात्रीच्या चित्रिकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पृथ्वीराज महाडिक, देवल क्लबचे अध्यक्ष व्हि.बी.पाटील, बी न्यूजचे संपादक चारूदत्त जोशी आणि संगीतकार शशांक पवार उपस्थित होते.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि दक्षतेचे सर्व नियम पाळून हे चित्रिकरण केले जात आहे. कोल्हापूरातील सुमारे २० संघ सदाबहार गाणी सादर करत असून त्याचे छायाचित्रण करून लवकरच या गाण्यांचे आणि एकांकिकांचे चॅनेल बी वरून प्रसारण होईल.

कोल्हापूरचे नागरिक दानशूर आणि कलाप्रेमी आहेत. जर प्रेक्षकांना एखादया कलाकाराचे सादरीकरण आवडले तर, त्यांनी ऐच्छिक रक्कम, एका विशिष्ट खात्यावर भरायची आहे. अशा प्रकारे गोळा होणारी सर्व रक्कम एकत्र करून, त्यातून कलाक्षेत्रातील गरजूंना आर्थिक मदत केली जाईल. कोल्हापूरचे कलाकार स्वाभिमानी असून, त्यांची कला आवडली तर, दानशूर नागरिकही त्यांना नक्की सढळ हाताने मदत करतील, असा विश्‍वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *