कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी जनतेनेही दक्ष राहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केले.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी पूर येणाऱ्या भागाचा दौरा करून, जनतेशी संवाद साधला. बापट कँप, जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा आदी भागात आमदार जाधव यांनी भेट दिली.
आमदार जाधव म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करीत असतानाच, आता पुराचा धोका समोर दिसू लागला आहे. अशावेळी दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी धरणांतील पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणांना दिला आहे.
यंदाही पावसाचे प्रमाण १०५ टक्के राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरपट्टय़ातील नागरिकांनी आतापासूनच सावधानता बाळगावी. गेल्या वर्षी ज्या भागात महापुराचे पाणी शिरले त्या भागातील नागरिकांनी पाणी वाढण्यापूर्वीच स्थलांतरित व्हावे. पूर्वानुभव लक्षात घेऊन जास्त हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे; मात्र त्याला जनतेनीही साथ देणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच पोलिस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. हीच यंत्रणा आता महापुराचा सामना करण्यासाठी रणांगणावर उतरवावी लागणार असल्याने या यंत्रणेवर किती कामाचा बोजा टाकायचा याचाही विचार जनतेने करावा, असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.
पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर ज्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी राहण्याची सोय करा.व नागरिकांना व जनावरांना सुरक्षित स्थळी हलवा. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वेळी सुरक्षित अंतराचा नियमही पाळावा लागणार असल्याने त्या दृष्टीनेही तयारी करावी, अशा सूचना आमदार जाधव यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, आपत्ती व्यवस्थापनचे रणजित चिले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शहर रचना विभागाचे नारायण भोसले, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.