Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून, तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या ठेक्याची टेंडर नोटीस महापालिकेच्या संकेतस्थळावर कुठेही दिसून आलेली नाही व बांधकाम विभागाच्या नोटीस फलकावर ही निदर्शनास आलेली नाही.
या भोजन ठेक्यासाठी १ कोटीची तरतूद केल्याचे समजते. महापालिका प्रशासनाने एवढ्या मोठ्या रकमेची निविदा प्रक्रिया ७ दिवसाच्या मुदतीने गुप्तपणे बिना प्रसिद्धी संशयास्पद पणे ठराविक लोकांनाच देण्यासाठी काढले असल्याचे निदर्शनास येत आहे.
या निविदेची मक्तेदारांना, बचत गटांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे गुप्तपणे ही प्रक्रिया राबवल्यामुळे सगळ्या मक्तेदारांना व बचत गटांना याची माहिती मिळाली नाही. ठराविक लोकांनाच हा ठेका जाणून-बुजून देण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवली आहे असा आरोप भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक माने यांनी केला.
भोजन ठेक्याची फेर निविदा काढावी व मोठ्या वर्तमानपत्रात प्रसिद्धी करावी. त्यामुळे गेल्या वेळी महापुराच्या वेळेला महापालिका प्रशासनावर जो बोगस भोजन ठेक्याची बिले काढण्यात आल्याचा आरोप होतो आहे, तो होणार नाही व महापालिकेचे आर्थिक हित जोपासले जाईल तसेच महापालिकेची प्रतिमा स्वच्छ राहील. तरी या भोजन ठेक्याची फेरनिविदा नियमाप्रमाणे काढून ती वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांनी लवकरच फेरनिवीदा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक माने, भाजपा गटनेते युवराज बावडेकर, राहुल माने, प्रथमेश वैद्य,अमित भोसले,राजू जाधव, अनिकेत बेळगावे, ऋषिकेश माने इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.