मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : वेळ सकाळी १०:१५ ची… ते सगळे परिघाप्रमाणे उभे राहतात… सर्वांचे हात जोडले जातात… लॅपटॉपवरील प्रार्थनेबरोबर खड्या आवाजात ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना’ प्रार्थनेला सुरूवात होते…
प्रार्थनेनंतर ध्यानधारणा ओमकार स्वराने…आणि हितगुजाने शेवट…हे दृष्य कोणत्याही शाळेतील नसून जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या कार्यालयातील आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यालयात ताण-तणाव मुक्त राहण्यासाठी ‘हितगुज’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये जिल्ह्यातील एखादा अधिकारी हितगुजासाठी बोलविला जातो. बालपणापासून हरवत गेलेलं हितगुज या निमित्ताने होत जातं. या हितगुजामधून एक नवी ऊर्जा मिळून जाते. त्यामुळे मनाला उभारी तर मिळतेच शिवाय प्रसन्न मनाने कार्यक्षमता वाढते.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, हेमंत निकम, दत्तात्रय कवितके, उपसंचालक भाग्यश्री फरांदे, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, लेखाधिकारी प्रशांत जाधव, डॉ. गोपाळ आयरोणी, पत्रकार अतुल जोशी आदी हितगुज करण्यासाठी सहभागी झाले आहेत.
या हितगुजामुळे गेल्या दोन महिन्यात आमच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला आहे. लवकर उठणे, योग साधना, वाचन करत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. ताण-तणावात उबगलेल्या मनाला, हरवलेल्या क्षणाला, प्रभावीपणे जगण्याची रसद पुरवणारा ‘हितगुज’ उपक्रम अन्य कार्यालयांमध्ये निश्चितच व्हायला हवा.