कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधिनगर पोलीस ठाण्यासाठी अनुभवी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांच्याकडे करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. तशा मागणीचे निवेदनही देसाई यांना देण्यात आले.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापडाची बाजारपेठ आहे. उंचगाव व गडमुडशिंगीसारखी मोठी गावे या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत समाविष्ट आहेत. कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या या गावांमध्ये चोऱ्या, दरोडे, खून, खंडणी, गुंडागर्दी असे प्रकार वारंवार घडतात.
खंडणीसाठी अपहरणाच्या घटना घडल्या असून, लहान मुलांपासून ते मोठ्या व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचे प्रकार घडले आहेत. याशिवाय या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुणे-बेंगलोर महामार्ग जात असून, एखादी मोठी घटना घडल्यानंतर अनुभवी अधिकारी ती सुलभरीत्या हाताळू शकतो. म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक दर्जाचा अनुभवी व जुना अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली.
तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार सुरेश साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भेटलेल्या शिष्टमंडळात विनोद खोत, पोपट दांगट, प्रफुल्ल घोरपडे यांचा समावेश होता.