Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस गजाआड करून त्यांच्याकडून आठ किलो २६ ग्रॅम गांजासह तीन लाख ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई उचगाव (ता. करवीर) येथील उड्डाण -पुलाखाली करण्यात आली.
स्वप्निल संतोष चरापले (वय २४ , सध्या रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुरज संभाजी पाटील (वय २४ ), अक्षय नामदेव पाटील (वय २४, दोघेही रा. कवठेपिरान, ता. शिराळा, जि. सांगली), वसीम अब्दुलसत्तार बानदार (वय २६, रा, पिरजादेनगर, चिंचणी रोड, तासगाव, जि. सांगली), तुकाराम सखाराम जगताप-मठकरी (वय ५४, रा. किल्ले मच्छिंद्र रोड, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गांधिनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकातील पोलीस नाईक आकाश पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक जण उचगाव उड्डाणपुलाखाली गांजा विक्रीसाठी येणार आहे.
या खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी गुन्हे शोधपथकातील कर्मचार्यांच्या मदतीने सापळा रचला.
दरम्यान स्वप्निल चरापले उचगाव उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून आल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या दुचाकीच्या डीग्गीमध्ये गांजा सापडला. त्याच्याकडे अधिक तपास केला असता सुरज पाटील, अक्षय पाटील, वसीम बानदार व तुकाराम जगताप या त्याच्या गांजा विक्री करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सहकाऱ्यांची नावे निष्पन्न झाली.
गुन्हे शोधपथकातील कर्मचाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील कवठेपिराण, तासगाव व किल्ले मच्छिंद्र रोड याठिकाणी जाऊन या चौघांना ताब्यात घेतले.
स्वप्निल चरापलेसह या पाच जणांच्या गांजा विकणाऱ्या टोळीकडून आठ किलो २६ ग्रॅम गांजासह दोन दुचाकी, पाच मोबाईल हँडसेट असा तीन लाख ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.
कारवाई करणाऱ्या शोधपथकात मोहन गवळी, आकाश पाटील, संदीप सावंत, आयुब शेख, संजय कोल्हे, राम पाटील, रवी पाटील, उदय खुडे, बालाजी हंगे, कृष्णात खामकर, महेश गायकवाड यांचा समावेश होता.
.