कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार ने वाढून आजअखेर सहा झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील साई वसन शाह कॉलनीमधील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नी आणि मुलगीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यापारी वसुलीच्या निमित्ताने परजिल्हा आणि परराज्यात जाऊन आल्याचे समजते.
हा व्यापारी राहत असलेला परिसर पूर्णपणे सील केला असून. परिसरातील सर्वांचीच वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, वळीवडे येथील हॉटेल व्यावसायिकाचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचा स्वब तपासण्यात आला. या तरुणाचा मावसभाऊ आणि भाचा असे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आजच्या अहवालानंतर वळीवडे येथील कोरोना रुग्णांची संख्या सहा झाली असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण गाव लॉकडाऊन केले असले तरीही परीसरातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत.