कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगरसह वळीवडे, चिंचवाड व गडमुडशिंगी परिसरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सोमवार १३ जुलै ते रविवार १९ जुलै अखेर गांधीनगर बाजारपेठेत जनता कर्फ्यूची अंमलबजावणी होणार आहे.
गांधीनगरच्या उपसरपंच रितू उर्फ सोनी सेवलाणी यांच्या अध्यक्षतेखाली व वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस होलसेल व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, गांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायत पदाधिकारी, प्रमुख व्यापारी, सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.सरपंच रितू लालवाणी उपस्थित नसल्याने उपसरपंच रितू उर्फ सोनी सेवलानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
त्यामध्ये सर्वानुमते झालेले निर्णय पुढीलप्रमाणे :
गांधीनगरमधील सर्व दुकाने बंद राहतील. त्यात होलसेल, रिटेल दुकाने व हॉटेल व्यवसाय, पान व चहा-नाश्ता टपऱ्या यांचा समावेश आहे.
आज सोमवार १३ जुलै रोजी दिवसभर भाजीपाला व किराणा दुकाने सुरू राहतील. त्यानंतर १७, १८ व १९ जुलै रोजी भाजीपाला व किराणा दुकाने दुपारी बारापर्यंत सुरु राहणार आहेत.
मेडिकल दुकाने मात्र नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग राखणे व महामारी संदर्भात जे शासकीय नियम आहेत ते कटाक्षाने पाळण्यात यावेत; अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था दंडात्मक कारवाई करतील, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.
या बैठकीस ग्रामविकास अधिकारी बी डी पाटील, भजनलाल डेंबडा, सुरेश अहुजा, अशोक तेहल्यानी, धीरज तेहल्यानी व ग्रामपंचायत सदस्यांसह व्यापारी उपस्थित होते.