उचगावमधील तरुण कोरोना पॉझीटिव्ह आल्याने गावात तीन दिवस लॉकडाऊन

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव (ता. करवीर) येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गाव ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवस लॉक डाऊन करण्यात आले आहे. तीन दिवस सर्व व्यवहार बंद राहतील.

उचगाव मेनरोडवरील एका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने उचगाव मुख्य रस्ता सील करण्यात आला. संबंधित तरुणाला श्वसनाचा त्रास होत असल्याने तो एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होता. त्याचा गांधीनगरात ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून उचगावमध्ये राहतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेण्याचे काम दिवसभर चालू राहिले. घरातील पत्नी, मुले, बहीण यांचेसह सहा जणांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सकाळी उचगाव मुख्य कमानीपासून ते दोस्ती ग्रुपपर्यंतचा रस्ता बॅरिकेट लावून ग्रामपंचायतने बंद केला. सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला.

उचगावमध्ये कोरोनाचा पहिलाच रुग्ण सापडल्याने उचगावमध्ये सर्व व्यवहार, दुकाने, भाजीपाला मार्केट तीन दिवस बंद करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

सरपंच मालुताई काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामसेवक अजित राणे, ग्रा प सदस्य मधुकर चव्हाण, अनिल दळवी, विनायक जाधव, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

चौकट
संपर्कात आलेल्या मध्यपिना शोधायचे कुठे?
हा कोरोना बाधित तरुणाचा राहत्या ठिकाणी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय आहे. त्याची पत्नी हा अड्डा चालवते असे समजते. अनेक जन याठिकाणी मद्यपान करण्यासाठी येऊन गेले आहेत. या मध्यपिना शोधायचे कुठे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *