कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महापौर निलोफर आजरेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेतील बांधकामास फायदा व्हावा, असे काम करण्याकरिता एका खाजगी जागेत सन २०२०-२१ च्या बजेटमध्ये तरतूद करून घेतली.
कोणत्याही पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत लाभासाठी महानगरपालिकेच्या निधीची तरतूद करणे हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हा आहे व त्यासाठी त्या व्यक्तीचे नगरसेवकपद अपात्र ठरवण्याची शिक्षा संबंधित अधिनियमात आहे. या कारणाकरिता भारतीय जनता पार्टीने महापौरांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवावे , अशी मागणी प्रधान सचिव, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली असून, या पत्राची प्रत विभागीय आयुक्त पुणे आणि आयुक्त कोल्हापूर यांना दिली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असूनही, प्रशासन यात लक्ष घालत नाही, त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
महिलाही कुटुंबाचा कणा असते आणि प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेत असते. परंतु महापौर पदावर विराजमान असणाऱ्या महिलेने आपल्या कुटुंबाची काळजी करताना पदाचा गैरवापर करून सार्वजनिक निधी वापरणे, हे अत्यंत चुकीचे आहे. महापौरांनी केलेल्या या गंभीर कृत्यामुळे केवळ महानगरपालिकेचीच नाही तर संपूर्ण कोल्हापूर ची बदनामी झाली आहे.
त्यामुळे दिनांक २० जुलै २०२० रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या महासभेत अध्यक्ष म्हणून काम करण्यास त्यांना मज्जाव करावा तसेच महापौर निलोफर आजरेकर यांनी पदाचा गैरवापर करून वैयक्तिक लाभाकरिता सार्वजनिक निधीची तरतूद केल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद अपात्र ठरवण्यात येण्यासाठी नगरविकास खात्याकडे योग्य तो पाठपुरावा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून निवेदनाद्वारे सादर केली.
आयुक्तांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून महापौरांवर कारवाई करावी अन्यथा बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीस प्रशासन पाठीशी घालत आहे, असे होईल. त्यावेळी आम्हाला महानगरपालिकेच्या विरोधातही लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून कायद्याने योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी भाजपा महिला आघाडीच्या शिष्टमंडळाला उत्तर देताना म्हणाले.
यावेळी भा.ज.पा महिला आघाडी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत, उपाध्यक्ष भारती जोशी, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर,आसावरी जुगदार,मंगल निपाणीकर, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, सुजाता पाटील, कार्तिकी सातपुते, समृद्धी पाटील आदी उपस्थित होते.