कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करा, अशा सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त आयोजित बैठकीत केल्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंगळवार दि.१४ जुलै रोजी महापौरांनी पदाधिकारी, पोलिस प्रशासन व अधिकारी यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती.
महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी बोलताना शहरातील रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सचे पालन होत नसलेने यावर तातडीने उपाययोजना करा. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांवर अधिक लक्ष द्या. याठिकाणी निर्बंध कडक करणे गरजेचे आहे. शहरामध्ये सुरु असलेल्या चहा, नाष्टयांच्या गाडयावर पार्सल ऐवजी जागेवरच खाण्यासाठी पदार्थ दिले जातात. त्याठिकाणी गर्दी होते. त्यामुळे विक्रेत्यांवर दंडात्मक करवाई करा. नियमाप्रमाणे टू व्हिलरवर एकच व्यक्ति व फोर व्हिलरमध्ये दोन व्यक्ति प्रवास करतील, याची दक्षता घ्या.
या नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस प्रशासनाने कडक करवाई करावी. समारंभासाठी व अंत्यविधीसाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अंमल करा. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची संयुक्त टिम करा. कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी दोन कोरोना योध्दा नेमा. नागरीकांबरोबरच व्यावसायिकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेचे बंधन पाळून आपले व्यवहार करा. या वेळेनंतर पोलिस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक करवाई करावी. कंन्टेमेंन्ट झोनमध्ये अधिका-अधिक प्रबोधन करावे, अशा सुचना महापौर आजरेकर यांनी केल्या.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, प्रशासनाच्या नियमाचे पालन व्हावे, म्हणून महापालिकेने पाच पथके व २०० कोरोना योध्दा कार्यरत ठेवलेली आहेत. लोकांची गर्दी कमी होऊन सोशल डीस्टन्स कसे पाळले जाईल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक यंत्रणा कशी सक्षम करता येईल, यासाठी प्रयत्न करुया. जे लोक विनाकारण फिरतात त्यांच्यावर कारवाई करा. ६२ वर्षावरील नागरीकांनी घराबाहेर यायला नको आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी नियमापेक्षा जास्त लोकांनी जमू नये. यासाठी परवानगी देताना हॉलची मर्यादा पाहून ५० लोकांपेक्षा कमी लोकांना परवानगी दिली जाईल. कार्यक्रम स्थळी केएमटीचे दोन कोरोना योध्दा व पोलिस यंत्रणा त्याठिकाणी पाहणी करतील. त्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असलेस, संबंधीतांवर कारवाई केली जाईल. तसेच प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या गाडीबरोबर दंडात्मक कारवाई करणेसाठी दोन पाळीमध्ये केएमटीकडील कर्मचारी उपलब्ध करुन देऊ. रस्त्यावर गाडया लावून खाद्य पदार्थ खाण्यास गर्दी झाल्यास संबंधीत विक्रेत्यावर कारवाई होणार, त्यांनी फक्त पार्सलच द्यावे गाडी जवळ कोणी खाद्य पदार्थ खाताना आढळलेस, त्यांच्यावर दंडात्मक करवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक वसंत बाबर यांनी बोलताना शहरामध्ये भाजी, फळे व खाद्य पदार्थ विक्रीच्या गाडीवर प्रामुख्याने गर्दी होत आहे. यामुळे रस्त्यावर ट्राफिकचीही समस्या वाढत आहे. हे जर टाळायचे असेल तर पार्सल सक्तीचे करणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, सहा.आयुक्त चेतन कोंडे, अवधुत कुंभार, राजारामपूरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एन.टी घोगरे, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एस.एल.कटकधोंड, लक्ष्मीपूरीचे पोलिस निरिक्षक ए.व्ही.गुजर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
