कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव (ता.करवीर) येथे दोन महिलांसह एका तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या आजअखेर आठवर पोहोचली आहे.
मुख्य रस्त्यावर गावभागात एक पंचेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. याशिवाय यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या गावठी दारूअड्डा चालवणाऱ्या पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आला. तसेच डफळे कॉलनीमध्ये राहणाऱ्या त्याच्या बहिणीचा व भाच्याचाही अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला.
सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण मिळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण कायम आहे. दरम्यान, उचगाव रविवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन केले आहे.
४५ वर्षीय महिला राजारामपुरी येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये काम करीत होती. या रुग्णालयातील एक जण पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी सकाळी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईक व इतर व्यक्तींना पुढील तपासणीसाठी सीपीआर येथे तपासणीसाठी नेण्यात आले.
तसेच उचगाव मुख्य रस्ता बॅरिकेट लावून ग्राम -पंचायतीने बंद केला आहे. आणि सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.
सरपंच मालुताई काळे, गणेश काळे, उपसरपंच मनीषा गाताडे, तलाठी महेश सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी अजित राणे, पोलिस पाटील स्वप्निल साठे, ग्रामपंचायत सदस्य संगिता अनिल दळवी, विनायक जाधव, मधुकर चव्हाण, रमेश वाईंगडे, रवी काळे, पैलवान मधुकर चव्हाण, अनिल दळवी, नामदेव वाईंगडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिसर सील केला.
चौकट
दारुअड्ड्याचा संपर्क पडला महागात
पॉझिटिव्ह आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या पत्नीचा, बहिणीचा व भाच्याचा अहवाल पॉझिटिव आला.
ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची पत्नी गावठी दारूचा अड्डा चालवते, अशी चर्चा कायम सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सात जणांची तपासणी करण्यात आली.
त्यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या दारुअड्ड्याचा संपर्क महागात पडला.