मिरज प्रतिनिधी शरद गाडे : कॉंग्रेसच्या नाराज नेते जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी मधील प्रवेश थांबवण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
डॉ. कदम यांनी शिष्टाई करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यासाठी महामंडळाचे ऑफर मान्य करून घेतली आहे. असे विश्वसनीयरित्या समजते.
मदन भाऊ गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या भूमिकेमुळे काँग्रेसला मोठा हादरा बसणार आहे. त्यासाठी डॉ. विश्वजीत कदम यांनी श्रीमती पाटील यांना तसा निर्णय घेऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
त्यासंदर्भात चार दिवसांपूर्वी डॉक्टर कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षश्रेष्ठी सोबत महत्त्वाची बैठक झाली या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , राज्यमंत्री सतेज पाटील , डॉ. कदम आदी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी याबाबत महत्त्वाची चर्चा झाली या बैठकीत जयश्री पाटील , डॉ. सिकंदर जमादार, नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी समोर तक्रारीचा पाढा वाचला.
पक्षात सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याची तक्रार केली, त्यावर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले .
यावेळी बैठकीत थोरात यांनी राज्यात आघाडी सरकार सत्तेत आहे राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पाटील यांच्या तक्रारीवर निश्चित तोडगा काढला जाईल, असा दिलासा दिला. डॉक्टर कदम यांच्या आग्रहाने श्रीमती पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची ग्वाही यावेळी दिल्याचे समजते.