कोल्हापूर.शिवाजी शिंगे : आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाय दूध व दूध भुकटीच्या अनुदानासाठी राज्यव्यापी एल्गार आंदोलन होत आहे. याच धर्तीवर आज भाजपा कोल्हापूर महानगर च्या वतीने देखील शाहूपुरी ५वी गल्ली याठिकाणी सिद्धिविनायक डेयरी समोर सकाळी ठीक ८.३० वाजता जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्य यांनी आजच्या आंदोलनाची माहिती उपस्थितांना दिली. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ज्यांनी इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य केले आणि ज्यांच्या आशीर्वादाने आज हे महाआघाडीचे सरकार रडतखडत का होईना, शेतकऱ्यांचा विचार न करता स्थापन झाले आहे. अशा राज्याच्या मुख्यमंत्री व या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, यापूर्वीदेखील २० तारखेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी यासंदर्भात सरकारला वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु अद्यापही या संदर्भात चर्चा न झाल्यामुळे आज हे आंदोलन करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, त्याचबरोबर बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रती आत्मीयता दाखवणाऱ्या या सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही, राज्यातील दुध उत्पादक शेतकरी ही अडचणीत आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रु. अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले. आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावलेले आहेत. मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध दत्पादक शेतक-यांना ही वा-यावर सोडुन दिले आहे.
आजच्या या राज्यव्यापी आंदोलनामध्ये रयतक्रांती, महासंग्राम, रा स प, रिपाई असे घटक पक्ष देखील समाविष्ट आहेत. भारत देश हा कृषिप्रधान देश असून, गेली अनेक वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत याउलट एजंटांची साखळी, व्यापारी, अडते यांना मोठे केले आहे.
भारतीय जनता पार्टीने नेहमी शेतकऱ्यांनी केलेले उत्पादन, बाय प्रॉडक्ट यांच्या किमती कशा वाढल्या पाहिजेत त्याला चांगला हमीभाव कसा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीची अशी मागणी आहे की, दुधाला प्रतीलिटर किमान ३० रुपये भाव मिळावा, गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान मिळाले पाहिजे, दूध भुकटी निर्यातीवर ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे. परंतु आजच्या आंदोलनानंतर देखील शेतकरी बांधवांना न्याय मिळणार नसेल तर, आगामी काळामध्ये अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे नमूद केले.
यावेळी सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, उपाध्यक्ष अमोल पालोजी, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय आगरवाल, सुनिलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, सचिन तोडकर, मंडल अध्यक्ष रविंद्र मुतगी, प्रग्नेश हमलाई, अभिजित शिंदे, नितीन देसाई आदी उपस्थित होते.