सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना रुग्णांवरती खासगी हॉस्पिटलमध्ये सरसकट मोफत उपचार करावेत , अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना आजाराने जिल्हयामध्ये गंभीर स्वरूप झालेले असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढत आहे. जिल्हयातील सर्व खाजगी रूग्णालयांनी पात्र नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा. रूग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र असो अथवा नसो यामध्ये टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दराची माहिती रूग्णालयात प्रदर्शित करणे रूग्णालयाला बंधनकारक करावे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासन देत असून सुध्दा काही खाजगी रूग्णालयांकडून त्याला दाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
खाजगी रूग्यालयात रूग्ण दाखल झाल्यानंतर सुरूवातीस डिपॉझिट भरण्यास सांगितले जाते. ही रक्कमही प्रत्येक रूग्णालयात वेगवेगळी आहे. त्यानंतर औषधे, इंजेक्शन तात्काळ घेवून येण्यास सांगितले जाते. भीतीपोटी रूग्णाच्या नातेवाईकांकडून कोणत्याही ठिकाणाहून पैशाची व्यवस्था करून महागडी औषधे उपलब्ध केली जातात. यातील नेमकी कोणती औषधे गरजेची आहेत. त्याचा वापर होतो का? अशा अनेक प्रश्नांच्याबाबतीत रूग्णाच्या नातेवाईकांच्या मनात शंका आहेत. त्याची समाधानकारक उत्तरे ना रूग्णालयाकडून ना प्रशासनाकडून मिळत आहेत.
आधीच लोकांची लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे लोक हैराण आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाची भिती दाखवत त्यांना अशाप्रकारे लुटण्याचे काम खुलेआम सुरू आहे. परिस्थितीचा विचार करून कोरोना पेशंटवरती खाजगी हॉस्पिटलमध्ये सरसकट मोफत उपचार करणेबाबत आपले स्तरावरून संबंधित खाजगी हॉस्पिटलना आदेश द्यावेत.
यावेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक माने, विश्वजीत पाटील, अश्रफ वांकर, गणपती साळुंखे, सुजित राऊत, चेतन माडगूळकर, कृष्णा राठोड, अमित देसाई, किरण पाटील, उदय बेलवलकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.