कोल्हापुरातील उद्योजकांकडून सिपीआरला सात व्हेंटिलेटर प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत उद्योजकांनी आज पन्नास लाख रुपयांची सात व्हेंटिलेटर सीपीआरला प्रदान केली. यापूर्वी २१ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेटर सीपीआरला प्रदान करण्यात आली आहेत.

कोरोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे कोल्हापुरातील उद्योजकांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी केले होते. यानुसार आज मेनन अँड मेनन, झंवर ग्रुप, सरोज ग्रुप ऑफ कंपनीज, मयुरा स्टील, कॅस्प्रो ग्रुप व सप्रे ग्रुप यांनी पन्नास लाख रुपयांची सात व्हेंटिलेटर दिली.

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे उद्योजकांनी व्हेंटिलेटर सुपूर्द केली. यापूर्वी कोल्हापूर उद्यम सोसायटी, शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व घाटगे पाटील इंडस्ट्रीज यांनी २१ लाख रुपये किमतीची तीन व्हेंटिलेटर दिली आहेत.
कोल्हापुरातील उद्योजकांच्या दातृत्वाने भारावून गेलो असून, या व्हेंटिलेटरचा रुग्णांना उपचार देण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलला व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. त्यामुळे मदतीसाठी उद्योजक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले.
यावेळी मेनन पिस्टन्स लिमिटेडचे सचिन मेनन, मेनन अँड मेनन लिमिटेडचे विजय मेनन, मेनन बेरिंग्जचे नितीन मेनन, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, झंवर उद्योग समूहाचे नरेंद्र झंवर, निरज झंवर, सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे दीपक जाधव, भरत जाधव, मयुरा स्टील्सचे चंद्रशेखर डोली, रवी डोली, कॅस्प्रो ग्रुपचे प्रकाश राठोड, महेंद्र राठोड, ट्रियो एंटरप्राईजेस (सप्रे ग्रुप)चे अजय सप्रे, पद्माकर सप्रे, सप्रे ऑटो अन्सिलरीसचे शिरीष सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *