मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे काल बुधवार दि.२ रोजी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
पुण्यात टीव्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे बुधवारी पहाटे निधन झालं. पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
मात्र, तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी ३० ऑगस्टला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं .
जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आय.सी.यु.मध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.
मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं.
त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा – सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला एम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय.सी.यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं.
थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा आणि आपल्याच मीडियाचा दुर्लक्षपणा!
केव्हढं दुर्दैव की तीन तासानंतरही त्यांच्या निधनाची दखल कोणत्याही मीडियाने घेतली नाही. त्यांच्याच चॅनलने सुध्दा नाही. हीच मीडियात काम करणाऱ्यांची शोकांतिका आहे. झालंच तर स्क्रोल पट्टीत किंवा सिंगलच्या बातमीत संपेल त्यांची निधन वार्ता. आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा आणि आपल्याच मीडियाचा दुर्लक्षपणा!, दुसरं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, त्याची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी गावी गेले, पुन्हा थोडी तब्येत बिघडली. तेव्हा स्वब टेस्ट केली तर ती पाॅझिटिव्ह आली. मग ते कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये गेले . तिथे ४० हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले, आधीच चणचण असल्याने तिथे ऍडमिट न होता ते पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. इथे दुर्लक्ष झाल्याने प्रकृती खालावत गेली.
खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाला. तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नुसतेच कोव्हिड सेंटर उभारले जाताहेत पण परिस्थिती मात्र बदलत नाही हे यावरुन दिसतंय, अशी प्रतिक्रिया पत्रकार व्यक्त करत आहेत.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनामुळे प्रसारमाध्यमात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज उठविणाऱ्या पत्रकारासाठी मात्र शासन, सरकार कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा देत नाहीत. अथवा त्या योग्य पत्रकारांपर्यंत पोहचत नाहीत, हेच वास्तव आहे. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न मात्र कायम प्रलंबित राहत आहेत. तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहेत, असेच वाटते. असा युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व श्रमिक पत्रकार संघ यांनी शोक व्यक्त केला.
पत्रकार पांडुरंग रायकर यांना युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी श्रद्धांजली वाहिली
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाने सर्व पत्रकारांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सर्व पत्रकार मंडळी सहभागी झाले असून युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.