विशेष प्रतिनिधी : रवी जगताप
कोल्हापूर : शिक्षकानो, संस्कारक्षम व जिज्ञासू नवी पिढी घडवा ! अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त “थॅंक अ टीचर” या अभियानांतर्गत मुंबईत असलेल्या मंत्री श्री मुश्रीफ यांनी ऑनलाईन गुगल मीटद्वारे तीनशेहून अधिक शिक्षकांशी संवाद साधला.
कागलचे गट शिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन संवादाच्या अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे सभापती विश्वासराव कुराडे होते.
या संवादात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार राज्यात लवकरच नवे शैक्षणिक धोरण जाहीर करणार आहे. शिक्षक व शिक्षण क्षेत्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
कोरोना काळात सहा महिने मुले घरात बसून आहेत, त्यांना गुंतवून ठेवलं पाहिजे , नाहीतर भरकटतील. त्यामुळेच अहमदनगरच्या संदीप गुंड आणि मयुरेश पाटील यांनी तयार केलेले ‘ऑनलाइन शाळा’ यासारखे महत्त्वकांक्षी ॲप कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे.
कागल तालुका पातळीवर डॉ. कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. डाॕ कमळकर व त्यांच्या संपूर्ण शिक्षण विभागाला आवश्यक ते सर्व सहकार्य राहील, असे सांगितले. तसेच ज्या मुलांना मोबाईल किंवा टॕब नाही त्याना तो लवकरच उपलब्ध करून देण्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
सौ पुनम पाटील – अध्यापिका, विद्यामंदिर बेलवळे खुर्द व रूपाली सुतार अध्यापिका, केंद्रशाळा तमनाकवाडा यांनी “आॕनलाईन शाळा “अॕपचा वापर, विद्यार्थ्यांचा सहभाग, पालकांचा प्रतिसाद याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य सुकुमार पाटील, संघटना प्रतिनिधी एस. के.पाटील, मुख्याध्यापक प्रतिनिधीनीही मनोगत व्यक्त केले. आभार रमेश कदम यांनी मानले.
देशाला शिक्षकांकडून अपेक्षा ………..
शिक्षकांकडून देशाला फार मोठ्या अपेक्षा आहेत, असे स्पष्ट करतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे मद्रास विद्यापीठाचे प्राध्यापक होते. ते विद्यार्थ्यांसह, शिक्षक आणि पालकांमध्येही अतिशय लोकप्रिय होते. कलकत्त्याला बदली झाल्यानंतर पालकांनी आग्रह केल्यावर त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी जाण्याचा दृढनिश्चय केला. बदलीच्या ठिकाणी जात असताना त्यांच्या निवासस्थानापासून रेल्वेस्थानकापर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी त्यांना बग्गीमध्ये बसवून पुष्पवृष्टी करत घेऊन गेले. या पद्धतीने शिक्षणक्षेत्र आणि समाजाशी एकरूप व्हा.
तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी हेड मास्तरांना लिहिलेल्या पत्राचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
सर्वजण सावधगिरी बाळगा……..
या संवादात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आत्तापर्यंत तीन वेळा माझी कुरणात टेस्ट निगेटिव्ह आली. म्हणजे ती कधीच पॉझिटिव्ह येणार नाही असेही नाही. मी सावधगिरी बाळगत आहे, तुम्ही सर्वांनी सावधगिरी बाळगा. त्यामुळे तुम्ही, तुमच्या कुटुंबियांचे आणि पर्यायाने समाजाचे रक्षण होईल.