सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभर कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्यामुळे आपल्या देशात व राज्यात नागरिकांना याची लागण होत आहे.
नागरिकांना उपचारासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचा कोव्हीड-१९ रुग्णांचा मृत्यू दर हा जागतिक मृत्यू दरापेक्षा अधिक आहे. सध्या सांगलीमध्ये दररोज ८०० ते १००० पेशंटचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असून पेशंट पॉझिटिव्ह होण्याचे सांगली जिल्ह्यातील प्रमाण हे महाराष्ट्र राज्य तसेच देशामध्ये पहिल्या नंबरवर आहे. ही बाब सांगलीसाठी निराशाजनक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कोव्हीड-१९ रुग्णालयांची अपूर संख्या व त्यातील सोयी सुविधांचा अभाव.
पुणे व मुंबई या शहरांमध्ये कोव्हीड-१९ जंबो हॉस्पिटल व्हेंटीलेटरच्या उपलब्धतेसह उभे करून रुग्णांची सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी व महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पुणे व मुंबई प्रमाणे कोव्हीड-१९ जंबो हॉस्पीटल उभे करणे गरजेचे आहे. असे कोव्हीड-१९ जंबो हॉस्पिटल उभे केल्यास नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून रुग्णांवर तातडीने उपचार झाल्यास जिल्ह्याचा कोव्हीड रुग्णांचा मृत्युदरही कमी होईल व नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी होईल. याबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेवून सदर मुंबई पुणे धर्तीवर जंबो कोव्हीड-१९ हॉस्पिटल उभे करण्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महाराष्टाचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, सांगलीचे पालकमंत्री ना.जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.
तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी यांना माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, कृष्णा राठोड, अमोल कणसे, आबा जाधव यांनी आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या निर्देशाने सदर निवेदन दिले.