विशेष प्रतिनिधी: जावेद देवडी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील सुरु असलेल्या रक्त विघटन केंद्राच्या कामाची पाहणी आज स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली.
स्थायी समिती सभापती सचिन पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, फिरंगाई कुटूंब कल्याण केंद्र येथील महानगरपालिकेच्या रक्त विघटन केंद्राच्या उभारणीत काही त्रुटी असल्यास त्या तात्काळ पुर्ण करण्याबरोबरच या केंद्रासाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध कराव्यात. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला आहे, त्यातून रक्त विघटन केंद्रासाठी आवश्यक असलेले साहित्यही खरेदी करण्यात यावे, अशा सुचना आरोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ यांना दिल्या.
फिरंगाई कुटूंब कल्याण केंद्र येथील रक्त विघटन केंद्रामधुन नागरिकांना सोयी – सुविधा मिळण्यासाठी हे केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी सुचना सभापती सचिन पाटील यांनी यावेळी केली. यावेळी स्थायी समिती सभापती यांनी फिरंगाई येथील कुटुंब कल्याण केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. तसेच सर्व कुटूंब कल्याण केंद्राची पाहणी करुन मार्गदर्शक सूचना केल्या.
ते म्हणाले, कोरोना विरुध्दच्या लढयात युध्द पातळीवर काम करतानाच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी आणि परिणामकारकरित्या जनजागृती करण्यातही पुढाकार घ्यावा, ज्यांनी ही संकल्पना मांडली व पाठपुरावा दिल्लीपर्यंत केला ते माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी या उर्वरीत कामासाठी जिल्हा नियेाजन समितीतून १ कोटीचा निधी मंजूर करुन आणला आहे.
यावेळी नगरसेविका जयश्री चव्हाण, सहा.आयुक्त संदीप घार्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजना बागडी, डॉ. विद्या भिसे, डॉ.प्रकाश गाडवे आदी उपस्थित होते.