मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 8 एप्रिल रोजी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे नितेश महादेव जगताप आणि कोंडिबा गुंडा शेंडगे यांनी विनापरवानगी सभा/बैठक घेतल्याबद्दल 7 एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीची चौकशी करून दि. 8 एप्रिलला दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, एक खिडकी योजना, व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि व्हीव्हीटी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मिरज तालुक्यातील शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, जानराववाडी, संतोषवाडी, कदमवाडी, एरंडोली, मालगाव येथे विशाल पाटील यांनी विनापरवानगी सभा/बैठक घेतल्याबद्दल दि. 8 एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीची चौकशी करून आचारसंहिता उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पलूस तालुक्यात कुंडल – पलूस रस्त्याकडेला मोक्याच्या जागी बेवारस दारू विक्री केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेवरून 3.96 बल्क लिटर्स देशी दारू व एक नायलॉन पिशवी असा एक हजार 169 रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आचारसंहिता कालावधीत नागरिकांना निदर्शनास येणाऱ्या तक्रारी नोंद करता याव्यात म्हणून तालुका व जिल्हा स्तरावर 24 तास संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जिल्हा स्तरावरील संनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02332600363 हा आहे.