मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो.
या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.
सांगली जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. 22 आणि 23 एप्रिल रोजी प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिराती प्रसिद्धीपूर्वी प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.