कोल्हापूर: ” कोरोनाने माणसाला जगायचं आणि जगवायचं कसं हे शिकविले. तसेच स्वच्छतेचे महत्त्व ही अधोरेखित केले. गुणवत्ता वाढीसाठी सरावाला फार महत्व आहे. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. पूर्वजांनी आपणाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत; आपण मात्र आपल्या मातीशी असणारी नाळ हरवत चाललो आहे “, असे मत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले
ते कै. सौ. हौसाबाई पवार ट्रस्ट व राज प्रकाशनतर्फे आयोजित कोरुना योद्ध्यांचा सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष वसंतराव देशमुख होते.
स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे मानद कार्यवाह प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. कोरोना काळामध्ये समाजभान जपत उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. स्वप्ना मिलिंद गायकवाड (वैद्यकीय सेवा), डाॅ. प्रांजली प्रकाश कांबळे (आरोग्य), सौरभ विलासराव निकम (सामाजिक), युवराज राजाराम पाटील (पत्रकारिता), रविंद्र शंकरराव लाड (वृत्तपत्र विक्रेता), चंद्रशेखर प्रकाश आमते (औषधसेवा) आदींचा सन्मानपत्र सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरोना काळामध्ये एकही दिवस आपला दवाखाना बंधन न ठेवता वैद्यकीय सेवा पुरविलेल्या डाॅ. स्वप्ना गायकवाड यांच्या पेशंट्सनी मनोगते व्यक्त केली.
आभार प्रदर्शन ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मजा पवार व सूत्रसंचालन प्रा. दिग्विजय पवार यांनी केले.
कार्यक्रमास डाॅ. मिलिंद गायकवाड, उदय गायकवाड, प्राचार्य डाॅ. दिनकर पाटील, सुनील कुरणे, मुख्याध्यापक बी. यु. जाधव, प्रकाश आमते, प्रा. टी. के. सरगर, ज्ञानदेव खारगे, अमित शिंत्रे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.