मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचे वृत्त समोर येताच भाजपाने यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक असून कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा चिमटा भाजपाने काढला आहे.
सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. प्रचारसभेनंतर राज ठाकरे हे सोलापूरमधील हॉटेल बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले, तर शरद पवारही उस्मानाबाद येथील सभा संपवून सोलापूरमधील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये पोहोचले. प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भातील वृत्त झळकल्यानंतर भाजपाने ट्विटरवरुन राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मार्च महिन्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच औरंगाबाद – मुंबई असा प्रवासही दोघांनीही एकाच विमानातून केला होता.