कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ८ : महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महिलांचे हक्क, कायदे आणि आरोग्य याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम व्हाव्यात, याकडे लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन पूजा राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणुन त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी (गडहिंग्लज) भाग्यश्री पवार, आहार, प्राणायम मार्गदर्शक नवीन नारायण साळुंखे, तहसीलदार सुनिता नेर्लीकर तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी महिला उपस्थित होत्या. यावेळी सेवानिृत्त तलाठी शशिकला साळुंखे यांना श्रीमती रेखावार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्रीमती रेखावार म्हणाल्या, दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा होतो. महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळत विविध क्षेत्रात महत्वाची पदे भूषवित आहेत. प्रशासकीय काम करताना निर्णय प्रक्रियेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. महिलांमध्ये निसर्गतः विविध कलागुण, सहनशीलता असते. आपल्यातील अलौकिक शक्तीचा वापर समाजात चांगले बदल घडविण्यासाठी करावा. आपल्या कामातून भावी पिढीसमोर आदर्श निर्माण करा. नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:चा आहार व आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलांचे हक्क, त्यांच्यासाठीचे कायदे आणि आरोग्य सुविधांची माहिती सर्व थरातील महिलांपर्यंत पोहोचवायला हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव म्हणाले, स्त्री हा कुटुंबाचा पर्यायाने समाज व्यवस्थेचा कणा आहे. कौटुंबिक भूमिका उत्कृष्टपणे पेलताना प्रशासकीय जबाबदाऱ्याही त्या सक्षमपणे पार पाडत आहेत, अशा शब्दात महिलांचा गौरव केला. तसेच कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी (गडहिंग्लज) भाग्यश्री पवार म्हणाल्या, महिलांनी कर्तव्य पार पाडताना स्वतःचे आरोग्य जपावे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून उद्याची सक्षम पिढी घडवावी, असा मोलाचा संदेश दिला.
आहार व प्राणायम मार्गदर्शक श्री. साळुंखे म्हणाले, घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यात ‘स्त्री’चा महत्वाचा वाटा असतो. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून कुटूंबातील स्त्री झटते, यासाठी त्या कर्मयोगी आहेत. सकारात्मक विचार करा, आहार, प्राणायम, व्यायामाकडे लक्ष द्या, सतत कार्यरत रहा, आहारात तंतूयुक्त पदार्थांचा वापर वाढवा. दुसऱ्याला दोष न देता आत्मपरिक्षण करा, स्वत:साठी वेळ काढा, असा सल्ला देवून वर्षातील प्रत्येक दिवस महिलेचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी अनुराधा सोनवणे, रंजना कोळी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नम्रता चौगुले यांनी तर सूत्रसंचालन नलिनी मोहिते यांनी केले. आभार तहसीलदार (महसूल) सुनिता नेर्लीकर यांनी मानले.
कार्यक्रमास तहसीलदार अनुक्रमे शितल भामरे, रंजना बिचकर, मैमुन्नीसा संदे, सरस्वती पाटील, अर्चना कापसे, माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला उपस्थित होत्या.