मुंबई/प्रतिनिधी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’मधील आरोपांना सोमवारी महाविकासआघाडीकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेत लक्षवेधी झाल्यानंतर यासंदर्भात बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, विधानसभेच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार लक्षवेधीनंतर मी फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देणार आहे.माझ्या या उत्तरात काय असेल, हे तुम्हाला तेव्हाच समजेल. तत्पूर्वी महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी किती बॉम्ब आहेत? हे बॉम्ब ते कधी आणि कसे फुटणार, हे त्यांनाच माहिती असेल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता दिलीप वळसे-पाटील सभागृहात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी हे दोन्ही नेते सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.