निपाणी/प्रतिनिधी : स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त करत पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधता येतो. या हेतूने गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल निपाणी यांच्या वतीने तीन ते बारा या वयोगटातील मुलांसाठी आयोजित ‘आयक्यु टेस्ट’ उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोमटेश’चे उदय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते वयोगटानिहाय प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या (दि.२) निमित्ताने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेमध्ये वयोगटानुसार प्रथम क्रमांक देण्यात आले. यामध्ये वयोगट तीन ते सात वर्षे -आरोही योगेश कांबळे, आठ ते नऊ वर्षे – तृप्ती अभिजित गौराई , दहा ते अकरा वर्षे – वेदांत संतोष शिंगण, वयोगट बारा वर्षे – आदर्श राजेंद्र माळगी यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले. उपक्रमास मुख्याध्यापिका ज्योती हरदी , दीपाली जोशी, नंदिनी पाटील, शोभा इंगळे, शाहिस्ता सय्यद ,महानंदा बक्कनावर, प्राची शहा , सुभाष इंगळे यांच्यासह पालक , शिक्षक ,विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ‘गोमटेश’च्या विद्यार्थींनीनी सादर केलेल्या स्वागत गीताने पारितोषिक वितरण समारंभाचा प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन वैशाली देशमाने यांनी केले.
‘गोमटेश’च्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण –
‘गोमटेश’ स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमानिमित्त विज्ञान विषयावरील रांगोळी, विविध प्रकारची चित्रे, माझी शाळा या विषयावरील निबंधांचे सादरीकरण केले . विद्यार्थ्यांनी सादर केलेली कलाकुसर उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली . बेळगावसह निपाणी परिसरात ‘गोमटेश’ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक नामवंत विद्यार्थी घडत आहेत. पाठयपुस्तकासह कला-क्रीडा विषयात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी दिली.